आज आर्थिकदृष्ट्या चीन भारताच्या खूप पुढे असला तरी, १९९० च्या दशकात परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी भारत आणि चीन दोघेही आर्थिक प्रगतीच्या एकाच सुरुवातीच्या टप्प्यावर उभे होते. याबद्दल आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सांगितले आहे की, तीन दशकांत चीनने भारताच्या जीडीपीच्या (GDP) जवळपास पाचपट मोठी अर्थव्यवस्था कशी केली. त्यांच्या मते, चीनच्या प्रगतीचे मुख्य कारण म्हणजे ‘फोकस्ड एक्झिक्युशन’ (म्हणजेच पूर्ण एकाग्रतेने आणि योजनेनुसार काम करणे) आणि सरकारचा समन्वय होय. चीनने सातत्याने पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली, तसेच कृषी आणि कामगार सुधारणा लवकर केल्या. सरकारच्या पाठिंब्यामुळे त्यांनी निर्यात-आधारित उद्योग उभे केले आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची इकोसिस्टम तयार केली, ज्यामुळे त्यांना प्रचंड गती मिळाली.
याउलट, भारताचा मार्ग संथ पण अधिक लोकशाहीवादी राहिला. गोएंका सांगतात की, भारताने उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रात जास्त बळकटी मिळवली. आपल्याकडील सुधारणा सर्वानुमते झाल्या आणि येथील विकास केंद्रीय नियोजनाऐवजी उद्योजकता (Entrepreneurship) आणि लोकांच्या उपभोग (Consumption) क्षमतेतून प्रेरित झाला. दोन्ही मॉडेल्सची स्वतःची बलस्थाने आणि कमतरता होत्या. चीनच्या मॉडेलने वेग आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन दिले, पण वाढते कर्ज आणि केंद्रीकृत धोक्यासारख्या समस्याही आणल्या. तर भारताचा मॉडेल स्थिरता आणि लवचिकता देतो, पण त्याला नोकऱ्या आणि उत्पादन वाढवण्यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. १९९० मध्ये भारत आणि चीनचे प्रति व्यक्ती उत्पन्न जवळजवळ समान होते, पण २०२५ पर्यंत चीनचा जीडीपी भारताच्या तुलनेत ५ पट मोठा झाला आहे. चीनने शिस्त आणि योग्य दिशा काय साध्य करू शकते हे दाखवले, आता लोकशाही आणि विविधता काय करू शकते, हे भारताला सिद्ध करावे लागेल, असे गोएंका यांचे मत आहे.



