leopards in Ahilyanagar : गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात बिबट्यांची दहशत वाढली आहे. ग्रामीण भागात नागरिकांवर बिबट्याचे (Leopard) हल्ले वाढत असल्याने नागरिक दहशतीमध्ये जगत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात 1 हजार पेक्षा जास्त बिबट्या असल्याची धक्कादायक माहिती मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले आहे.
उपाय योजनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून निधी देण्याची तयारी असल्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने केलेल्या उपाय योजनांची माहीती जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक सालविठ्ठल यांच्याकडून घेतली.
जिल्ह्यात 1150 बिबटे असल्याचा अंदाज आहे मात्र यापैकी 25 बिबट्यांना पकडण्यात यश आले आहे.मात्र वनविभागाच्या हलगर्जीपणावर मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यात 350 पिंजरे लावले आहेत. 4 थर्मल ड्रोन्स् 4 ट्रॅग्युलायझेशन गन्स आणि 250 ट्रॅप कॅमेरे जिल्ह्यात कार्यान्वित केले असले तरी बिबट्यांचा वावर चिंताजनक आहे.जिल्ह्यातील वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानूसार बैठकीत अधिकचे उपाय करण्याबाबत प्रशासनाने निर्णय केले असले तरी वनविभागाने आवश्यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात दाखवलेल्या निष्क्रीयतेवर मंत्री विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील घटनांचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे.जिल्ह्या करीता 22 रेस्क्यू वाहन,अतिरीक्त पिंजरे ट्रॅग्युलायझेशन गन तसेच कृत्रिम बुध्दीमतेचा वापर करून ड्रोनद्वारे स्थळ निरीक्षण करण्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू मात्र वनविभागाने प्रस्ताव तरी पाठवले पाहीजेत आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.



