भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. छत्तीसगडविरुद्ध मुंबईकडून खेळताना त्याने ३०३ चेंडूंमध्ये १५९ धावांची शानदार खेळी केली. या अप्रतिम खेळीनंतर रहाणेने निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय चुकीचा होता, असे त्याने स्पष्ट केले. अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांना थेट सांगितले की, खेळाडूंना संघातून वगळताना नुसते ‘वय’ पाहू नये, कारण वय हा केवळ एक आकडा आहे. जर एखादा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत असेल आणि शारीरिकदृष्ट्या फिट असेल, तर केवळ वयाच्या आधारावर त्याला बाजूला काढणे योग्य नाही. निवडकर्त्यांनी खेळाडूचा फिटनेस, अनुभव आणि खेळाप्रती असलेले समर्पण हे गुण विचारात घ्यावेत, अशी त्याची मागणी आहे.
३७ वर्षीय रहाणेने आठवण करून दिली की, २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकून देण्यात त्याने कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. विराटकडे नेतृत्व नसताना गाबा कसोटी जिंकून २-१ ने मालिका जिंकणे हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मरणीय विजय आहे. इतका अनुभव असूनही, जेव्हा त्याला संघातून बाहेर काढले जाते, तेव्हा खूप वाईट वाटते, असे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, २०२४-२५ च्या निराशाजनक ठरलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघातून वगळताना बीसीसीआय किंवा निवडकर्त्यांनी त्याला कोणतेही कारण किंवा माहिती दिली नाही, याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताला ती मालिका १-३ ने गमवावी लागली होती. एकीकडे रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये असूनही संघाबाहेर आहे, तर दुसरीकडे याच वर्षी रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे मोठे खेळाडूही मे २०२५ मध्ये कसोटीला अलविदा करत आहेत. भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांमध्ये ५०७७ धावा करणाऱ्या रहाणेने स्पष्ट केले की, तो आजही क्रिकेटवर प्रेम करतो आणि जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत खेळत राहील.



