चित्रपटसृष्टीतील एक अतिशय भयावह आणि काळी बाजू म्हणजे ‘कास्टिंग काऊच’. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेले असे वाईट अनुभव आजवर शेअर केले आहेत. याच मालिकेत आता लोकप्रिय इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर आणि अभिनेत्री डॉली सिंग हिनेही तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. ‘थँक यू फॉर कमिंग’ आणि ‘डबल XL’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या डॉलीने सांगितले की, जेव्हा ती अवघी १९ वर्षांची होती आणि अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी दिल्लीत आली होती, तेव्हा तिला एका कास्टिंग दिग्दर्शकाच्या लैंगिक छळाला सामोरे जावे लागले.
डॉली सिंगने झूमला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा अनुभव कथन केला. एका प्रोजेक्टसाठी मीटिंगच्या निमित्ताने तिला एका लक्झरी हॉटेलमध्ये बोलावण्यात आले होते. सुरुवातीला तो दिग्दर्शक वारंवार फोनवर बोलत असे, जे तिला थोडे विचित्र वाटत होते, पण संधी गमावण्याच्या भीतीने तिने दुर्लक्ष केले. हॉटेलमधील बैठक संपल्यानंतर सर्वजण गाडीत बसले. तेव्हा त्या दिग्दर्शकाने अचानक डॉलीला किस केले आणि नंतर तिचा शर्ट बाजूला करून तिच्या छातीजवळ हात नेला. दिग्दर्शकाच्या या अघोरी कृत्याने डॉली खूप घाबरली. तिला काय करावे हे सुचत नव्हते. प्रसंगावधान राखून तिने लगेच त्याला मेट्रो स्टेशनजवळ सोडण्यास सांगितले आणि तिथून कशीतरी स्वतःची सुटका करून घेतली. अभिनय क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या अनेक नवोदित कलाकारांना सुरुवातीला अशा वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते, पण डॉलीच्या या किळसवाण्या अनुभवाने पुन्हा एकदा इंडस्ट्रीतील या काळ्या बाजूकडे लक्ष वेधले आहे.



