सध्या बंगालच्या उपसागरावर ‘मोंथा’ चक्रीवादळ घोंगावत असल्यामुळे हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला आहे. सुरुवातीला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्वेकडील भागात तयार झालेले हे कमी दाबाचे क्षेत्र वेगाने पश्चिमेकडे सरकत असून, ते अत्यंत भयावह चक्रीवादळाचे रूप धारण करेल अशी भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, हे कमी दाबाचे क्षेत्र २६ ऑक्टोबरपर्यंत ‘खोल दाबाच्या पट्ट्यात’ रूपांतरित झाले आणि २७ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याचे दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
या चक्रीवादळाची तीव्रता इतकी असेल की, २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ते ‘प्रचंड’ चक्रीवादळात परिवर्तित होऊ शकते. या ‘मोंथा’ चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका आंध्र प्रदेश राज्याला बसण्याची शक्यता आहे. २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीच्या सुमारास हे वादळ मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनमच्या दरम्यान, काकीनाडाजवळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकेल. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११० किलोमीटरपर्यंत असू शकतो. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवामान विभागाने २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी दक्षिण आणि किनाऱ्यावरील जिल्ह्यांसाठी जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे २६ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला आहे, कारण या दिवसांदरम्यान ओडिसाच्या किनाऱ्यावरील समुद्राची स्थितीही अत्यंत खराब राहण्याची शक्यता आहे.



