Harshwardhan Sapkal on Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सुपुत्र पार्थ पवार यांची कंपनी अमीडीयाने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1804 कोटी रुपये बाजारभाव असलेली 40 एकर जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानंतर आता या प्रकरणात अजित पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवारच्या कंपनीने पुण्यातील वतनाची 40 एकर जमीन भ्रष्ट मार्गाने बळकावल्याचे उघड झाले आहे. पार्थ पवार यांनी हजारो कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटी रुपयात म्हणजे कवडीमोल भावाने हडप केली असून स्टँप ड्युटी फक्त 500 रुपये दिली आहे. सरकारच्या ताब्यात असणाऱ्या वतनाच्या या जमिनीचा व्यवहार झालाच कसा? असा प्रश्न विचारून भ्रष्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पुढे म्हटले आहे की, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची अमेडिया नावाची कंपनी असून या कंपनीने कोरेगाव पार्क भागातील जमीन अत्यंत अल्प किंमतीत घेतली आहे, ज्या कंपनीने हा व्यवहार केला त्या अमेडिया कंपनीचे भागभांडवल फक्त 1 लाख रुपये आहे. अमेडिया कंपनीला या जागेत आयटी पार्क उभारायचे आहे आणि त्यास सरकारच्या उद्योग संचालनालयाने अवघ्या 48 तासात मंजुरीही दिली. सरकारच्या ताब्यात असलेली वतनाची जमीन विकत घेता येते का ? स्टॅम्प ड्युटी माफ का केली? असे प्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित करून हा व्यवहार रद्द करावा व संपूर्ण व्यवहाराशी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.



