BMC Election: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सुरुवातीला राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी मतदान होणार आहे. तर माहितीनुसार जानेवारी महिन्यात मुंबईसह इतर महापालिकेसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिका (BMC Election) जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून आज पक्षाने मोठा निर्णय घेत चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे. भाजपने आपल्या मुंबई युनिटमध्ये चार नवीन सरचिटणीसांची नियुक्ती केली आहे. राजेश शिरवाडकर, गणेश खापरकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळेकर यांना मुंबई (Mumbai) भाजपचे सरचिटणीस म्हणून नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या ताब्यातील मुंबईमहानगर पालिका घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार तयारी सुरू केली असून आता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नियुक्त केलेल्या भाजपच्या जिल्हा प्रभारींची बैठक घेतली. यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हा प्रभारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना या मिनी विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या विजयासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे निर्देश दिले.



