Rupali Thombre : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील एका महिला डॉक्टर आत्महत्या प्रकारावरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे पाटीलमध्ये (Rupali Thombre Patil) होणाऱ्या आरोप प्रत्यारोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) रूपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावत सात दिवसांमध्ये खुलासा देण्याचे आदेश दिले होते.
या नोटीसला आता रूपाली ठोबरे पाटील यांनी उत्तर देत मी कोणतीही शिस्त भंग केली नाही मी केवळ राष्ट्रीय अध्यक्षांच्या मताचा सन्मान ठेवून भूमिका मांडली असं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे.
रूपाली ठोबरे पाटील म्हणाल्या की, मी कोणतीही शिस्त भंग केली नाही मी केवळ राष्ट्रीय अध्यक्षांच्या मताचा सन्मान ठेवून भूमिका मांडली आहे.
आपण दिनांक 7/11/2015 रोजी राज्य महिला आयोग अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्या संदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा मागितला आहे.
राज्य महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष महिला यांच्याबाबत कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे याविषयीची नोटीसमध्ये कोणतीही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसमध्ये नमूद केले असते तर त्यावर खुलासा करणे योग्य झाले असते.
तसेच राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष हे पूर्णपणे स्वतंत्र विभाग आहेत त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता.
राज्य महिला आयोगाने केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाला सुद्धा रोषाला सामोरे जावे लागले होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतर मी स्वतः बीड येथे जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेस डॉक्टर संपादा मुंडे यांच्या कुटुंबाची आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे फोन द्वारे बोलणे करून दिले होते.
त्यावेळी दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नाही असे सांगितले होते. मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझं मत मांडलं होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणी हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्तभंग झालेला नाही.



