Sudhir Mungantiwar : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने फक्त 6 जागा जिंकल्याने आता विरोधक काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. तर आता कधीतरी म्हणावं लागेल की ‘काँग्रेस’ नावाचा एक पक्ष होता असा टोला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लावला आहे.
माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, बिहारच्या निवडणुकीवरून कोणीही शाब्दिक कोटी करण्याचा प्रयत्न करू नये. साधारणतः हिंदीत ‘जो जीता वही सिकंदर’ असे म्हणण्याची पद्धत आहे. जर वाद घालण्याचा प्रयत्न केला तर त्याचे नुकसान भारतीय जनता पक्ष किंवा एनडीएचे नाही, तर स्वतः विरोधकांचेच आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर अशी परिस्थिती का आली? याचे आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे असं ते म्हणाले.
तर उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत. ते आमचे कधीकाळचे सहकारी होते; पण त्यांनी ज्या पद्धतीने आमचा विश्वासघात केला, त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीपासून फारकत घेतली, ही आमची भूमिका आहे. काँग्रेसचा विचार आणि शिवसेनेचा विचार यात कधीही समानता नव्हती. फक्त मुख्यमंत्री पदासाठी ते एकत्र आले होते आणि शेवटी व्हायचे तेच झालं असं देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
तर काँग्रेसने मुंबईत एकट्याने लढण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ, काँग्रेसची प्रत्येक कृती ही स्वतःला संकुचित करण्याचा प्रयत्न करणारी आहे. आता आमच्या मनात उद्धव ठाकरे यांना मदत करावी, अशी कोणतीही सहानुभूती उरलेली नाही. काँग्रेस कधी वटवृक्ष होता, त्यावर बोन्साय होम्याची वेळ आली. काही काळापूर्वी ‘काँग्रेस’ नावाचा एक पक्ष होता, असे म्हणण्याची वेळ काँग्रेसने स्वतःवर ओढवून घेतली आहे असा टोला देखील त्यांनी लावला.
मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक परिस्थिती आणि स्थानिक नेतृत्वाच्या चर्चेतूनच योग्य निर्णय घ्यावे लागतात. 1996 मध्ये आमचे सरकार असतानाही आम्ही कल्याण-डोंबिवलीमध्ये वेगवेगळे लढलो होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर त्यावर पुढे काही बोलण्याची गरज नाही असेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.



