Pakistan vs Srilanka : रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेच्या तिसऱ्या एक दिवशी सामन्यात पाकिस्तानने शानदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. याचबरोबर पाकिस्तानने तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला आहे.
रविवारी रावळपिंडी येथे झालेल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा 32 चेंडू शिल्लक असताना 6 विकेट्सने पराभव केला. पाकिस्तानने पहिला एकदिवसीय सामना 6 धावांनी आणि दुसरा एकदिवसीय सामना 8 विकेट्सने जिंकला होता.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या आघाडीच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, परंतु त्यापैकी कोणीही चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करू शकले नाही. परिणामी, श्रीलंकेचा संघ 45.2 षटकांत 211 धावांवर गारद झाला.
श्रीलंकेकडून सदीरा समरविक्रमाने सर्वाधिक 48 धावा केल्या. कुसल मेंडिसनेही 34, पवन रथनायकेने 32, कामिल मिश्रा 29 आणि पथुम निस्सांका यांनी 24 धावा केल्या. पाकिस्तानकडून वसीम ज्युनियरने शानदार गोलंदाजी केली आणि 10 षटकांत 47 धावांत 3 बळी घेतले. हरिस रौफ आणि फैसल अक्रम यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. कर्णधार शाहीन आफ्रिदी आणि फहीम अश्रफ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर हसिबुल्लाह खान खाते न उघडताच बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या 8 होती. फखर जमान आणि बाबर आझम यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. फखर 45 चेंडूत 55 धावा काढून बाद झाला, ज्यामध्ये 8 चौकारांचा समावेश होता.
बाबर आझम 52 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला आणि सलमान अली आघा 11 चेंडूत 6 धावा काढून बाद झाला. 115 धावांत चार विकेट गमावलेल्या पाकिस्तानला यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान आणि हुसेन तलत यांनी स्थिरावले. या दोघांनी नाबाद 100 धावांची भागीदारी केली आणि संघाला 32 चेंडू लवकर विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 44.4 षटकांत 4 बाद 215 धावा काढून 6 विकेटने सामना जिंकला. रिझवान 92 चेंडूत 61 धावा काढून नाबाद राहिला आणि तलत 57 चेंडूत 42 धावा काढून बाद झाला. श्रीलंकेविरुद्ध हा पाकिस्तानचा सलग चौथा एकदिवसीय मालिका विजय आहे.



