Dhule News : शिरपूर तालुक्यातील भोरखेडा शिवारात गेल्या काही दिवसांपासून भीतीचे वातावरण तयार करणाऱ्या बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. परिसरात सतत बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकरी भयभीत झाले होते. रात्रीच्या वेळी पाळीव जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडत असल्याची माहिती समोर आल्यानंतर वनविभागाने तत्परता दाखवत सापळा रचला.
भोरखेडा परिसरात बिबट्याचे हालचाली दिसताच काही शेतकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर वृक्षमित्र शिवाजी राजपूत यांच्या ‘ऑक्सीजन पार्क’ परिसरात कॅमेरे तसेच पिंजरा लावून नजर ठेवण्यात आली होती. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्पष्ट झाले.
बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले. अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत शेतीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वनविभागाच्या पथकाने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेत बिबट्याला सुरक्षित बाहेर काढले. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, पकडलेल्या बिबट्याची प्राथमिक प्रकृती तपासणी करून त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील वन्यजीव रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बिबट्याच्या उपस्थितीमुळे उद्भवलेला धोका पूर्णपणे टळला असून नागरिकांनी अफवा पसरवू नयेत, तसेच कोणतीही हालचाल दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



