Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. याचा कारण म्हणजे तिने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. एका रिलच्या माध्यमातून तिने तिच्या साखरपुड्याबाबत बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
स्मृतीने इंस्टाग्रामवर एक रील पोस्ट केली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला. या रिलमध्ये स्मृती एकटी नव्हती तिच्यासोबत संघातील खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी देखील दिसत आहे.
सर्व खेळाडूंनी मिळून लगे रहो मुन्ना भाई चित्रपटातील “समझो हो ही गया” या प्रसिद्ध गाण्यावर एक रील तयार केली आणि रीलच्या शेवटी, स्मृती मानधना कॅमेऱ्याकडे हातवर करते आणि तिची साखरपुड्याची अंगठी दाखवते.
स्मृती पलाश मुच्छलशी लग्न करणार
स्मृती मानधना गायक आणि संगीतकार पलाश मुच्छलशी लग्न करणार आहे. इंदूरमधील एका कार्यक्रमादरम्यान पलाशला याबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने विनोदाने सांगितले की स्मृती लवकरच “इंदूरची सून” बनेल. तेव्हापासून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
स्मृतीची विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरी
तर दुसरीकडे आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये तिच्या शानदार फलंदाजीने स्मृती मानधनाने भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तिने नऊ डावात 54.22 च्या सरासरीने 434 धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या तिच्या शतकामुळे भारताला एक महत्त्वाचा सामना जिंकता आला.
या कामगिरीसह, स्मृती मानधन महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक धावा करणारी भारतीय फलंदाज बनली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मानधनाचे योगदान महत्त्वाचे होते. तिने तिची सलामीची जोडीदार शफाली वर्मासोबत फक्त सात षटकांत 50 धावांची भागीदारी केली. या जलद सुरुवातीमुळे सुरुवातीपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव निर्माण झाला.



