Gondia News : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीने आत्मसमर्पणासाठी 1 जानेवारी 2026 ची मुदत मागितली होती. प्रवक्ता अनंत याने यासंदर्भात 27 नोव्हेंबरला पत्रक जारी केले होते. पण त्यापूर्वीच महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याच्यासह दरेकसा दलमच्या 11 जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड (एमएमसी) विशेष क्षेत्रीय समितीचा प्रवक्ता अनंत याने 24 नोव्हेंबरला आत्मसमर्पणाची तयारी दर्शवत 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत मागितली होती. यानंतर छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी ‘सरकारकडे अधिक वेळ नाही, माओवाद्यांनी विना विलंब शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे’ असे स्पष्टीकरण दिले होते. यानंतर 27 नोव्हेंबरला माओवाद्यांनी नवे पत्रक जारी करत 1 जानेवारीला सर्व जण शस्त्रत्याग करून मुख्य प्रवाहात येऊ, असे जाहीर केले होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी गोंदिया पोलिसांशी संपर्क साधून अनंत उर्फ विकास सह 11 जहाल नलक्षवाद्यांसह आत्मसमर्पण केले. या सर्व नक्षलवाद्यांवर 89 लक्ष रुपयांचा बक्षीस होता. तर या सर्व आत्मसमर्पित नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला असल्याची माहिती अंकित गोयल, गडचिरोली क्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक यांनी दिली.
आत्मसमर्पित केलेल्या नक्षलवाद्यांची नावे :
स्पेशल झोन कमिटी मेंबर अनंत उर्फ विकास नागपुरे, डी. व्ही. सी. एम. कमांडर नागसु गोलू वड्डे, रानो पोरेटी, संतु पोरेटी, संगीता पंधरे, प्रताप बंतूला, अनुजा कारा, पुजा मुडीयम, दिनेश सोट्टी, शीला मडावी आणि अर्जुन दोडी



