Bajrang Sonawane : बीडच्या माजलगावमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. हे आंदोलन आता मोठ्या प्रमाणात पसरले असून तीन कारखाने, तीन मोठे गूळ युनिट आणि इतर गुळाचे युनिट बंद पडले आहेत.
ऊसाला तीन हजार रुपये पहिली उचल आणि अंतिमतः 4000 रुपये प्रति टन भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांची आता प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांचा देखील केजमध्ये कारखाना असून ते 3000 रुपये भाव देत आहेत मात्र त्यांच्याच पक्षाचे मोहन जगताप माजलगावमध्ये असलेल्या कारखान्यातून तीन हजार रुपये भाव देण्यास तयार नाहीत. त्यांचा देखील कारखाना शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे.
मोहन जगताप यांच्यासमोरच खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांना भाव दिलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर रिकव्हरी रेट बघून संस्था देखील चालू राहिली पाहिजे या सर्व गोष्टींचा विचार करून भाव दिला पाहिजे. मात्र, शेतकऱ्यांना भाव वाढवून दिलाच पाहिजे या मताचा मी आहे असं खासदार बजरंग सोनवणे म्हणाले.
तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आता राज्य सरकारने सरसकट कर्ज माफी द्यावी अशी मागणी करत आहे. मात्र शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्ज माफी देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याने विरोध राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसकडून या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे.



