Pune Accident : हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी (ता. 1 डिसेंबर ) संध्याकाळी झालेल्या अपघातात दोन निरागस भावंडांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पंचरत्न चौकाजवळ आली असताना चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट पदपथावर घुसली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या अपघातात अर्चना देवा प्रसाद (8) आणि सूरज देवा प्रसाद (6) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह पुढील तपासासाठी औंध रुग्णालयात हलविण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रिया देवा प्रसाद (16) आणि अविनाश हरिदास चव्हाण (26) गंभीर जखमी असून विमल राजू ओझरकर (40) यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पोलिसांनी बसचालक नागनाथ राजाभाऊ गुजर (36, रा. भोसरी) याला ताब्यात घेतले. चालकाने नशेत वाहन चालविल्याचा संशय वर्तवला जात असून, त्याची वैद्यकीय तपासणी सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली. ते म्हणाले, “अकस्मात झालेल्या या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, हिंजवडी परिसरात सायंकाळच्या सुमारास कंपन्या बंद होण्याच्या वेळेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच जड वाहनांच्या वाढत्या व अनियंत्रित हालचालीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. सोमवारीच्या या घटनेमुळे परिसरातील रहिवासी आणि आयटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप आणि भीती निर्माण झाली आहे.



