Vijay Wadettiwar: पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला अटक होते पण जमीन विकत घेणाऱ्या अमेडिया कंपनीचे मालक पार्थ पवारवर कारवाई का होत नाही? यातून मुख्यमंत्र्यांचा बारामती करांच्या पाठीशी किती मोठा आशीर्वाद आहे हे स्पष्ट होते अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. पुणे जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने जमीन विकत घेतली. या कंपनीत 99 टक्के भागीदारी ही पार्थ पवारची आहे. जमीन ज्यांनी विकली त्यांच्यावर कारवाई होते पण जमीन विकत घेणाऱ्यांवर कारवाई होत नाही? पार्थ पवारवर कारवाई झालीच पाहिजे,अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. अधिवेशनात विरोधक हा प्रश्न विचारणार याची सरकारला कल्पना असल्यामुळे काहीतरी कारवाई केल्याचा दिखावा आता सरकार करत आहे अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
पुणे जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी समितीला मुदतवाढ देखील यासाठी दिली आहे.या समितीचा अहवाल जर आला असता तर अधिवेशनात सरकारवर नामुष्की आली असती म्हणूनच समितीला मुदतवाढ देऊन सरकार हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
नागपूर इथे हिवाळी अधिवेशन हे तीन आठवडे चालणे अपेक्षित होतें. या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळते याकडे लक्ष असते.पण आता निवडणुकीचे कारण दाखवून अधिवेशन सात दिवसात गुंडाळण्यात येणार आहे. एकीकडे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे दुसरीकडे आचारसंहितेचे कारण दाखवून सरकार या अधिवेशनात कोणतीही घोषणा करू शकत नाही, त्यामुळे या अधिवेशनात विदर्भाच्या तोंडाला पानचे पुसली जाणार अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये इतक्या तक्रारी आल्या आहे.अनेक ठिकाणी मारामारीच्या घटना घडल्या, मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचे पुरावे तर सत्ताधारी आमदारांनी दिले तरी कोणतीही कारवाई झालेली नाही. आता जिथे ईव्हीएम ठेवण्यात आले तिथे सीसीटीव्ही लाईव्ह फुटेज देत नाही, तिथे मोठ्या स्क्रीन लावण्यात आलेले नाही, जिथे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या त्या खोलीच्या बाहेर जॅमेर लावण्यात आलेले नाही यातून मतचोरी होणार हे स्पष्ट दिसत आहे. निवडणुका झाल्या आणि 268 जागांपैकी 175 जागा भाजप जिंकणार हे कशाच्या आधारावर भाजपचे नेते बोलत आहेत? मतचोरी आणि मशीनच्या आधारावर सरकार बोलत आहे ना? असा सवाल वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.



