Thane Crime: ठाण्यातील कोपरीत मासळी विक्रेत्या आजींची दिड लाख रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना रविवारी घडली. मच्छी विक्री करीत असताना त्याठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरीता थोडे बाजुला गेले असता 22 ते 24 वर्षीय चोरट्याने मोक्का साधला. या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोलशेत येथे राहणाऱ्या नंदा सपकाळ (83) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोपरी, सिद्धार्थ नगर येथे त्या आणि त्यांची सून मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी 7 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता त्या एकट्याच मासे विक्री करीत होत्या. मासे विक्री करीता सोबतीच्या इतर महिला आल्या नसल्याने त्या एकट्याच होत्या.
मासे विकल्यानंतर त्याचे पैसे त्या रोख स्वरूपात व स्कॅनरद्द्वारे स्वीकारतात. सकाळपासुन मासे विक्रीत स्कॅनरद्वारे 96 हजार तसेच रोख स्वरूपात दीड लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मानलेला भाऊ विनायक जाधव हा तेथे आला होता.
भावाशी बोलण्याकरीता त्या थोडे बाजुला गेल्या. त्यावेळी एक काळा शर्ट पॅन्ट घातलेला तरुण मासे विक्रीच्या ठिकाणी घुटमळत होता. काही वेळानंतर पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावर तेथे ठेवलेल्या बास्केटमधील पांढऱ्या प्लॅस्टिकच्या पिशवीमधील मासे विक्रीतुन मिळालेल्या पाचशे रुपयांच्या 300 नोटाची पिशवीच गायब झाल्याचे आढळुन आले. रोकडची ती पिशवी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केले असुन कोपरी पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती रवींद्र पानसरे, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिली.



