Farmers News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे करताना दिसत आहे. मात्र आतापर्यंत कर्ज माफी न झाल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
तर दुसरीकडे बाजारात देखील शेतमालाला योग्य दर न मिळत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्याने पाथर्डीमधील
कोळसांगवी येथील विठ्ठल भाऊसाहेब गाडे (वय 45) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.
राज्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी तयार असणारे पीक वाहून गेल्याने अंगावर असणारा कर्जाचा बोजा आणखी वाढला. तर दुसरीकडे बियाणे व खतांच्या भावात देखील मोठी वाढ झाली आणि शेतीमालाला बाजारात योग्य भाव न मिळाल्याने आज शेतकरी मोठ्या अडचणीत आहे.
तर दुसरीकडे कर्जमाफीसाठी सरकारने केवळ घोषणा केली आहे आणि कर्जमाफीसाठी कडक अटी व गुंतागुंतीच्या कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणताही दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.



