6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Harshwardhan Sapkal : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या नाहीतर…, हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

Harshwardhan Sapkal: नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, नवी मुंबईच्या विकासासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या व त्यावेळी भूमीपुत्राच्या हक्कांसाठी दि. बा. पाटील यांनी दिर्घ लढा दिला. १२.५ टक्के योजना ही दि. बा. पाटील यांच्या आंदोलनामुळेच शक्य झाली आहे.

दि. बा. पाटील यांची आमदार व खासदार अशी प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. नवी मुंबईत, जेएनपीटी, नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विकसीत होत असताना भूमिपुत्रांनी दिलेल्या योगदानाकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रास्त असून जनभावनेचा आदर केला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले असले तरी त्यांचा कावा सर्वांना माहित आहे. ‘फडणविसांचा कावा ना कळे ब्रम्हदेवा’, असा आहे, असे सपकाळ म्हणाले.

नवी मुंबई विमानतळाचा उल्लेख सध्या एनएम विमानतळ असा केला जात आहे. विमानतळाच्या कुंपनाच्या भिंतीवरही एनएम अक्षरे कोरली जात आहेत. हे एनएम म्हणजे नरेंद्र मोदी विमानतळ असे तर नाही ना असा दाट संशय बळावत चालला आहे. अहमबादच्या क्रिकेट स्टेडियमचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी यांचे दिले आहे, पण असा कोणताही कावेबाज पणा भाजपा वा देवेंद्र फडणवीस यांनी करु नये. लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवला आहे, राज्यसभेतही ही मागणी लावून धरली जाईल, असे सपकाळ म्हणाले.

माणिकराव कोकाटे यांना अटक का नाही?

माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा होऊन तीन दिवस झाले पण अद्याप त्यांची आमदारकी रद्द केली नाही व अटकही केलेली नाही. लिलावती रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात आहे, आणि चोराच्या दिमतीला पोलीस ठेवले आहेत. शिक्षा ठोठावताच तात्काळ कारावई केली पाहिजे होती पण कारवाई ही फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच केली जाते, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

एमडी ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या..

सातारा जिल्ह्यातील सावरी गावात एमडी ड्रग्जचा कारखाना उघड झाला असून ज्या जागेत हा काळा धंदा सुरु होता ती जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या नावावर आहे. हा प्रकार सर्वात प्रथम काँग्रेस पक्षाने उघड करून कठोर कारवाईची मागणी केली होती. भ्रष्टाचाराचा पैसा कमी पडतो की काय म्हणून आता अंमली पदार्थांचा धंदा करुन पैसा मिळवला जात आहे. या सरकारला जनाची तर नाहीच पण मनाचीही नाही. एवढे सर्व उघड होऊनही एकनाथ शिंदे यांचा एमडी ड्रग्जच्या कारखान्याशी संबंध नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. हा प्रकार अत्यंत गंभीर असून एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या