3 New Airlines : भारतात लवकरच तीन नवीन विमान कंपनी प्रवेश करणार आहे. ज्यामुळे प्रवाशांना विमान सेवा स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.
शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस.या विमान कंपन्या लवकरच सुरू होण्याची तयारी करत आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी 23 डिसेंबर 205 रोजी याची घोषणा केली.
या कंपन्या भारतीय आकाशात नवीन स्पर्धा आणतील आणि प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध करून देतील.
मंत्रालयाकडून एनओसी मिळाला
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी गेल्या आठवड्यात या तीन विमान कंपन्यांच्या टीमशी भेट घेतली. शंख एअरला मंत्रालयाकडून आधीच ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले होते. या आठवड्यात अल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेसला एनओसी देण्यात आले. एनओसीसह, या कंपन्या आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून एअर ऑपरेटर प्रमाणपत्र (एओसी) मिळविण्याची प्रक्रिया सुरू करतील. त्यानंतरच व्यावसायिक उड्डाणे शक्य होतील.
राम मोहन नायडू यांनी सांगितले की, बाजारात निरोगी स्पर्धा राखण्यासाठी आणि भाडे नियंत्रित करण्यासाठी शक्य तितक्या नवीन विमान कंपन्यांना प्रोत्साहन देणे हे सरकारचे ध्येय आहे.
लहान विमान कंपन्यांना चालना
भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक बाजारपेठांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंतर्गत सरकारी धोरणे आणि उडान योजनेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी मजबूत झाली आहे. स्टार एअर, इंडिया वन एअर आणि फ्लाय 91 सारख्या लहान विमान कंपन्या लहान शहरांना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नवीन विमान कंपन्यांच्या आगमनामुळे लहान मार्गांवर उड्डाणांची उपलब्धता देखील वाढेल.
शंख एअरच्या सुरुवातीच्या योजना
उत्तर प्रदेशस्थित शंख एअर सुरुवातीला लखनौ ते वाराणसी, गोरखपूर, अयोध्या, चित्रकूट, इंदूर आणि देहरादून सारख्या शहरांसाठी सेवा सुरू करेल. ही राज्यातील पहिली मोठी विमान कंपनी असेल आणि प्रादेशिक प्रवास सुलभ करेल.
अल हिंद एअर केरळस्थित अल हिंद ग्रुपशी संलग्न आहे, तर फ्लाय एक्सप्रेस हैदराबादस्थित कुरिअर कंपनीच्या मालकीची आहे. या सर्व कंपन्या देशांतर्गत मार्गांवर लक्ष केंद्रित करतील.



