Sanjay Shirsath : छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेत शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार असून भाजपबरोबर कुठली मैत्रीपूर्ण लढत होणार नसल्याची घोषणा राज्याचे मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांच्याकडून करण्यात आली आहे.
संभाजीनगरमध्ये युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले. आम्ही स्थानिक पातळीवर आम्ही बैठका घेतल्या पण भाजपचे स्थानिक कार्यकर्ते एक वेगळ्या भूमीकेत पाहायला मिळाले असं माध्यमांशी बोलताना मंत्री संजय शिरसाठ म्हणाले.
माध्यमांशी बोलताना संजय शिरसाठ पुढे म्हणाले की, शंका अगोदर आली होती. मी दरवेळेस स्थानिक नेत्यांना फोन करून बैठका केल्या. बावनकुळे यांच्या बरोबर देखील बैठक झाली. शेवटच्या संपर्कात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या समोर जागा वाटप ठरले होते.
त्यावेळी युती झाली या संभ्रमात होतो. मात्र ज्यावेळी जागा द्यायची तेव्हा शिवसेनेच्या जागा सोडल्या जातील असा प्रस्ताव दिला.
आमचे कार्यकर्ते नाराज होतील अशी त्यांची भूमिका होती आणि दुसरीकडे युतीच्या चर्चा असल्याचे सांगणे असेही यावेळी संजय शिरसाठ म्हणाले.
या घडीला सुद्धा कोणताही नवीन प्रस्ताव दिला नाही. आग्रही भूमिकेला तडा दिला. आमची ताकद वाढली आम्ही काहीही करू शकतो, असा त्यांना अहंकार होता त्याचा अंत आज भाजप शिवसेना युती तोडल्याने झाली.
आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही, थेट लढत होईल. या लढाईत जशाच्या तसे वार केले जाईल. असा इशारा देखील संजय शिरसाठ यांनी भाजपला दिला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.



