Ahilyanagar Municipal Corporation Election : अहिल्यानगर महापालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात युती झाली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना या निवडणुकीच्या रिंगणात स्वबळावर उतरणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
भाजपा, राष्ट्रवादीच्या युती मध्ये राष्ट्रवादीला 34 जागा तर भाजपाला 32 जागा मिळणार आहे. महायुतीतुन एकनाथ शिंदेंची शिवसेना बाहेर पडल्यानंतर भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने युती केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे आता अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुतीत फूट पडल्याने चौरंगी लढत पहायला मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटात युतीसाठी चर्चा होती मात्र शिवसेना शिंदे गटाला समाधानकारक जागा मिळत नसल्याने अखेर त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तर आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली असून भाजप 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 34 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.



