Solapur Politics : सोलापुरात भाजपमध्ये तिकीट वाटपानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक असलेल्या राजकुमार आलूरे यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक 5 ड मधून राजकुमार आलूरे यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र त्यांचे तिकीट डावलून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या बिज्जू प्रधाने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री प्रभाग क्रमांक 5 मधील बाळे परिसरात बैठक पार पडली. या बैठकीत बंडखोरी कायम ठेवत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
“आमदार विजयकुमार देशमुख हे आमच्या पाठीशी आहेत. काहीही झालं तरी आम्ही निवडणूक लढवणारच,” असा निर्धार भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजकुमार आलूरे यांनी व्यक्त केला. यावेळी पक्षाकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
दरम्यान, भाजपने पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. अन्यथा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे. त्यामुळे आज बंडखोरी करणारे कार्यकर्ते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



