Utkarsha Rupavate : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत युती केल्याने भाजप आता घाबरली आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडी च्या राज्य प्रवक्ते उत्कर्षा रूपवते यांनी भाजपवर केली आहे.
उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडी संघटन बांधून महानगरपालिका निवडणुका सशक्तपणे लढत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती आहे. नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय आहे.
मीडियामधून सांगण्यात येत आहे की नेत्यांमध्ये व कार्यकर्त्यांमध्ये, तसेच दोन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. भाजप आणि त्याचे मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस यांच्या युतीमुळे घाबरले आहेत. हे दोन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवतील, ही भीती त्यांना वाटत आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे सर्व समूहांना एकत्र करून हा विजय महत्त्वाचा असणार आहे. नेते व कार्यकर्त्यांनी कोणत्याही चुकीच्या बातम्यांना बळी पडू नये. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती मुंबईत भक्कम आहे. एकत्रित ताकदीने ही निवडणूक लढवली जाणार आहे.
आता उरलेल्या 12 दिवसांत कार्यकर्त्यांनी आपला वॉर्ड व आपला बूथ सांभाळावा आणि वंचित बहुजन आघाडीचा विजयाचा झेंडा महानगरपालिकांमध्ये फडकवावा असं उत्कर्षा रूपवते म्हणाल्या. मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
तर दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत बिनविरोध झालेल्या निवडणुकीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.



