Shashank Ketkar : सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने या पोस्टमधून शशांकने निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर थेट निशाणा साधला असून, ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
या व्हिडिओमध्ये शशांक केतकरने स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. “हा व्हिडिओही वेगवेगळ्या पद्धतीने ट्रोल केला जाईल, याची मला पूर्ण जाणीव आहे. काही जण म्हणतील आता पुन्हा मनोरंजन सुरू झालं, तर काहींचं मत असेल की हा नेहमीच तक्रारी करत राहतो. काहीजण मला शांत बसत नाही असंही म्हणतील. पण मी या इंडस्ट्रीत काम करतो, हा माझा व्यवसाय आहे आणि मी माझी सेवा प्रामाणिकपणे देतो,” असं शशांकने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
शशांकने यावेळी आपल्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादाचाही उल्लेख केला असून, आपल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचं तो सांगतो. याचसोबत, शशांकने निर्माता मंदार देवस्थळी यांच्याशी झालेल्या संभाषणाचे व्हॉट्सॲप स्क्रीनशॉट्स देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या संपूर्ण प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे, अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी शशांक केतकरच्या या भूमिकेला उघडपणे पाठिंबा दिला आहे. याआधीही चिन्मयी सुमित यांनी मराठी कलाकारांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. मराठी कलाकार, मराठी भाषा तसेच चित्रपट व मालिकासृष्टीतील बॅकस्टेज आर्टिस्ट्स यांच्या प्रश्नांवर त्या नेहमीच ठामपणे भूमिका मांडताना दिसतात.
चिन्मयी सुमित यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे शशांक केतकरच्या मोहिमेला पाठिंबा जाहीर करत, या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांच्या या समर्थनामुळे शशांक केतकरच्या वक्तव्याला आणखी बळ मिळालं असून, या संपूर्ण प्रकरणाला आता नेमकं कोणतं वळण मिळणार, याकडे मराठी मनोरंजन विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.



