BMC Election: नवी मुंबईत भाजपच्या उमेदवारांकडून प्रचार पत्रके गुजराती भाषेतून वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रचार पत्रकाला मनसेने विरोध दर्शवला आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत भाजपवर टीका केली आहे. भाजपकडून मराठी भाषेला राज्यभाषेचा दर्जा दिल्याचे सांगितले जाते, मात्र नवी मुंबईत त्यांचेच उमेदवार गुजराती भाषेचा वापर करून नेमकं कोणाला आकर्षित करत आहेत? असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
“हे प्रचार पत्रक मराठी भाषेत का वाटले गेले नाही? मराठी भाषेला पुन्हा एकदा दुय्यम दर्जा का दिला जातोय?” असा थेट प्रश्न गजानन काळे यांनी विचारला आहे.
नवी मुंबई शहराची ओळख ही आगरी-कोळी भाषा आणि संस्कृतीची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात युती झाल्याने मुंबईत राजकीय समीकरणे बदलली असून कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.



