Pune Politics: भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर धावून जात शिवीगाळ केल्याचा आरोप असून निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
हा प्रकार 10 जानेवारी रोजी सायंकाळी मंगळवार पेठेतील सदानंद नगर परिसरात घडला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आदित्य दीपक कांबळे (वय 24) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निलेश आल्हाट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवार पेठेत थांबले होते. याचवेळी भाजप आणि आरपीआयचे कार्यकर्तेही शुभेच्छा देण्यासाठी आल्याने परिसरात गर्दी झाली.
या गर्दीचा फायदा घेत आरोपींनी प्रभाग क्रमांक 24 मधील भाजपच्या सर्व उमेदवारांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी सागर कांबळे याने गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.



