Harshwardhan Sapkal: नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नांदेड महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर व खळबळजनक घटना घडली आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या या निवडणुक कूनितीची ही फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे.
सोलापूरात एका उमेदवाराचा खुन झाला, राज्यातील अनेक उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्या कुटुंबियांना धमकावण्यात आले. त्याचीच प्रचिती आज नांदेड मध्ये ही मिळाली. विशेष म्हणजे हे सगळे उमेदवार विरोधी पक्षातीलच आहेत, जे आज सत्तेत बसलेल्या गुंड, मवाल्यांच्या भ्रष्टयुतीला भिडण्याची हिंमत दाखवताहेत. ते लढताहेत हीच त्यांची चुक आहे का ? याचे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे.
देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता पक्षाने जन्माला घातलेली विषवल्ली महाराष्ट्राच्या जागरूक जनतेने चांगलीच ओळखलीय, आणि तेच ही विषवल्ली आता कापल्याशिवाय थांबणार नाही.



