Satara Crime News : उंब्रजमध्ये चोरट्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. एका रात्रीत तीन दुचाकी पळवून नेत चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना शुक्रवारी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. कराड तालुक्यातील उंब्रज येथील चोरे रोड परिसरात काही अज्ञात चोरटे फिरत होते. गणपती मंदिरासमोर उभी केलेली ॲक्सेस दुचाकी त्यांनी काही सेकंदांत पळवून नेली.
याच वेळी चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून आणखी दोन दुचाकी—एक ॲक्सेस आणि एक ॲक्टिवा—याही अगदी त्याच पद्धतीने पळवून नेल्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे चेहऱ्यावर मास्क बांधून सहजपणे परिसरात हालचाल करताना दिसत आहेत. त्यामुळे हे चोरटे अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने काम करत असल्याचे स्पष्ट होते.
एकाच रात्री तीन वाहनांची चोरी
चोरट्यांनी घेतलेली जागोजागची रेकी पाहता स्थानिक पोलिसांच्या दक्षतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. “चोरटे इतक्या सहजपणे गाड्या घेऊन जातात, मग पोलिस नेमके काय करतात?” एका रात्रीत तीन दुचाकी गायब झाल्याने उंब्रज परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र चोरटे अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



