Nitesh Rane : एमआयएम प्रदेशाध्यक इम्तियाज जलील यांनी संपूर्ण महाराष्ट्राला हिरवा करणार असं वक्तव्य केल्यानंतर आता भाजपकडून देखील इम्तियाज जलीलांवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. इस्लाम राष्ट्राच्या मनसुब्यांना थारा नाही असा इशारा राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी दिला आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, ज्यांना आपल्या भारत देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान मान्य नाही, या देशामध्ये शरिया कानून आणून लोकशाही संपवायची आहे आणि या देशाचे इस्लामीकरण करून ‘इस्लाम राष्ट्र’ बनवायचे आहे, अशा पद्धतीचे कोणतेही मनसुबे किंवा षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी असताना कोणीही यशस्वी करू शकत नाही.
आपण इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, ज्या ज्या इस्लामिक आक्रमकांनी आमच्या महाराष्ट्राकडे आणि देशाकडे वाकड्या नजरेने पाहिले, त्यांना याच महाराष्ट्राच्या भूमीत गाडून दाखवले आहे. मग अशा पद्धतीचे इम्तियाज जलील, ओवेसी हे नेमके कोण? हे तर चिल्लर लोक आहेत.
त्यामुळे त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगतो की, त्यांनी परत एकदा मूळ भगव्यामध्ये यावे. तुमचे आम्ही धर्मांतर करू आणि जो आपला मूळ धर्म आहे. हिंदू धर्म तो लवकरात लवकर स्वीकारला, तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखे तडफडावे लागणार नाही असं मंत्री नितेश राणे म्हणाले.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले की, एक भारतीय म्हणून आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. आपण आपल्या शेजारील राष्ट्रांकडे पाहिल्यानंतर निश्चितपणे अभिमान वाटतो की, आपल्या संविधानामुळे नागरिक म्हणून आपले आयुष्य अधिक सुखकर झाले आहे, आपल्याला अधिकार मिळाले आहेत आणि आपला भारत देश किती मजबूत आहे, हे आजचा दिवस साजरा करत असताना आपल्याला अनुभवायला मिळते.



