Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना तिच्या लग्नामुळे गेल्याकाही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
23 नोव्हेंबर रोजी सांगली येथे संगीतकार पलाश मुच्छलशी तिचा विवाह होणार होता मात्र स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्याने लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृती मानधनाने घेतला आहे.
माहितीनुसार, स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना रविवारी सकाळी अचानक आजारी पडले. सुरुवातीला कुटुंबाला ही किरकोळ समस्या वाटत होती, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सांगली येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्मृतीने तिच्या कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावरून लग्नाच्या पोस्ट काढल्या
स्मृती मानधनाचे व्यवस्थापक तुहिन मिश्रा यांनी सांगितले की स्मृती मानधना यांनी स्वतःहून तिचे वडील पूर्णपणे बरे होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तिचे संपूर्ण लक्ष तिच्या कुटुंबावर आणि तिच्या वडिलांच्या आरोग्यावर आहे. दरम्यान, तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तिच्या लग्न आणि साखरपुड्याशी संबंधित सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच स्मृतीने एक मजेदार इंस्टाग्राम रील शेअर करून तिच्या साखरपुड्याची घोषणा केली.
विश्वचषकात शानदार कामगिरी
तर महिला क्रिकेट विश्वचषकात स्मृतीने शानदार कामगिरी करत भारताला विजय मिळून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. भारताकडून एका विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड तिने आता आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे सध्या अचानक ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.



