Ahilyanagar Election: राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील 8 नगरपरिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यात तब्बल 72.25% मतदान हे झाले त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यात कोठे किती टक्के मतदान?
जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मंगळवारी (2 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली असून राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार श्रीरामपूरमध्ये 66.62% संगमनेर मध्ये 72.75% राहुरीमध्ये 72.46% राहतामध्ये 77.87% श्रीगोंदामध्ये 79.84% शेवगावमध्ये 69.4% जामखेडमध्ये 75.63% तर शिर्डीमध्ये 75.16% मतदान झाले आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात 72.25% एवढे मतदान झाले.
संगमनेर आणि जामखेडमध्ये बाजी कोण मारणार?
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या संगमनेर आणि जामखेड नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे.
संगमनेरमध्ये तांबे विरुद्ध खताळ अशी लढत पाहायला मिळाली तर जामखेडमध्ये रोहित पवारविरुद्ध राम शिंदे यांच्यात लढत झाली. जोरदार प्रचार करत सभेद्वारे या दिग्गजांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
मतदानात श्रीगोंदा अग्रेसर
तर दुसरीकडे श्रीगोंदामध्ये सर्वाधिक 79 टक्के मतदान झाले तर सर्वाधिक कमी 66% मतदान श्रीरामपूरमध्ये पार पडले. श्रीगोंदा मध्ये पाचपुते विरुद्ध नागवडे, जगताप आणि शेलार असा सामना पाहायला मिळाला तर श्रीरामपूरमध्ये प्रकाश चित्ते, करण ससाने व भाजपकडून देण्यात आलेले उमेदवार बिहाणी यांच्यामध्ये मुख्य लढत झाली.



