Ahilyanagar Election: अहिल्यानगर महापालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले असले तरी महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असलं तरी महायुती संदर्भातील अवघ्या काही जागांवरची चर्चा ही अंतिम टप्प्यात राहिली असल्याने लवकरच निर्णय घोषित करणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
नगर महापालिकेत 68 जागेसाठी निवडणूक होणार आहे. मात्र जागा वाटपासंदर्भात एकनाथ शिंदे सेनेने पूर्वीच्या विद्यमान नगरसेवकांच्या जागेवर दावा केल्याची माहिती आहे. तसेच सेनेने महायुतीत यावं असं मत देखील भाजपाचे राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केलं होतं
त्यामुळे घटकपक्षासोबत झालेल्या बैठकीत सर्वच सकरात्मक असून महायुतीच्या जागेबाबतचा तिढा लवकरच सुटणार असून निवडणुकीला महायुती म्हणूनच सामोरे जाणार असल्याची माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे.
अहिल्यानगर महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.
तर दुसरीकडे पुण्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत देखील अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र निवडणूक लढणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



