Ahilyanagar Municipal Corporation Elections: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात लोकशाहीवर थेट घाला घालणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय मतदान केंद्रावर बनावट निवडणूक ओळखपत्रांच्या आधारे मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
आता या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित संशयित इसमांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाची सखोल पोलीस चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ३ चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली आहे.
प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद विद्यालय येथील केंद्रावर काही व्यक्तींकडे बनावट आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्रे आढळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले की, संबंधित इसमांना तातडीने तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
सध्या पोलिसांमार्फत या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यांच्या आधारे पुढील योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.



