Ahilyanagar ZP : जिल्हा परिषदेचा सामान्य प्रशासन विभाग हा संपूर्ण यंत्रणेचा केंद्रबिंदू मानला जातो. सर्व विभागांचे कामकाज, मनुष्यबळाची अदलाबदल, शिस्तभंगाची कारवाई, तसेच दैनंदिन प्रशासनाची धुरा हा विभाग सांभाळतो. त्यामुळे या विभागात बाहेरील कर्मचाऱ्यांची उपस्थिती आपोआप संवेदनशील ठरते. मात्र, अलीकडच्या काळात कृषी, ग्रामपंचायत तसेच काही इतर विभागातील मोजक्याच कर्मचाऱ्यांची या विभागात नियमित ये-जा वाढल्याचे दिसून येत आहे.
यामुळे कर्मचारी वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांचा सामान्य प्रशासन विभागाच्या कामाशी थेट संबंध नसतानाही ते वारंवार उपस्थित राहतात, हे अनेकांच्या लक्षात आले आहे. प्रशासनाशी निगडित कामे नसताना या विभागात येणे-जाण्याची गरज नेमकी काय, हा प्रश्न कर्मचाऱ्यांमध्ये सातत्याने उपस्थित होत आहे.
जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर विशिष्ट नियंत्रण पाळले जाते. अशा वेळी इतर विभागातील काही निवडक कर्मचाऱ्यांची सततची वर्दळ पाहून विविध शंका-कुशंका निर्माण होत आहेत. काहींचा उद्देश कागदपत्रांच्या कामांसाठी येणे असू शकतो, तर काहींचे हेतू स्पष्ट नसल्याने याबाबत संभ्रम पसरला आहे.
सामान्य प्रशासन विभाग हा जिल्हा परिषदेचा ‘आत्मा’ मानला जात असल्याने या विभागात अनावश्यक वावर होऊ नये, अशी अपेक्षा वरीष्ठांकडून असते. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसत असल्याने काही कर्मचारी असंतोष व्यक्त करत आहेत. प्रशासनातील पारदर्शकता राखण्यासाठी या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
या वाढत्या ये-जा प्रकरणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून आवश्यक ती चौकशी करावी, अशी कर्मचाऱ्यांकडून मागणी होत आहे.



