Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. पिंपरी-चिंचवड आणि पुण्याशी अजितदादांचे अतूट, जिव्हाळ्याचे नाते असल्याने शहरात चौका-चौकात अजितदादांना श्रद्धांजली चे फलक लागले आहेत.
दादांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी शहरातून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी बारामतीला पोचले होते. गुरुवारी उद्योगनगरीत आणि पुण्यात सर्वत्र अजितदादा आपल्यात नसल्याचे दुःख पसरले होते. बाजार पेठांमधील व्यवहार थंडावले होते. व्यापाऱ्यांनी सर्व लहान-मोठी दुकाने बंद ठेवली होती. पिंपरी- चिंचवड आणि पुण्यामध्ये ठिकठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केल्याचे फलक दादांची सतत आठवण करुन देत आहेत. या दोन्ही शहरांत घराघरांमध्ये अजितदादांच्या जाण्याचा शोक व्यक्त केला जात आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अजितदादांचा सातत्याने वावर असायचा आठवड्यातील दोन दिवस तरी ते शहरात असायचे त्यामुळे त्यांच्या स्वागताचे बॅनर अनेक ठिकाणी लागायचे. मात्र, आज श्रद्धांजली चे बॅनर लागल्याने सगळ्यांचाच कंठ दाटून येत होता. या दोन्ही शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवत आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वर्दळ फारच कमी होती.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. पिंपरी-चिंचवड हे शहर तर अजितदादांनीच घडवलेले आहे. त्यामुळे अजितदादा हवे होते असेच शब्द या दोन्ही शहरातील नागरिकाकडून व्यक्त करण्यात येत होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून च झाली होती. त्यांनी 1992 मध्ये पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तेव्हा पिंपरी-चिंचवडचा बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश होता. या निवडणुकीत अजित पवार लोकसभेत निवडून गेले होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सलग 15 वर्षे सत्ता होती. या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास त्यांनी केला.



