Maharashtra Election : राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे उमदेवारांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार उघडीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे.
महायुतीचे उमेदवार मन्सूर मोमीन यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी एका कागदावर काळी बाऊली व कसल्यातरी बिया व एका मोबाईलची बंद बॅटरी ठेऊन करणीचा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार लक्षात येताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी घरासमोर जमा झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार का केला याबाबत अद्याप स्पष्टता नसून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे.
21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार
तर दुसरीकडे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी पार पडलेल्या निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी (21डिसेंबर) रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. यापूर्वी 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार होते मात्र आरक्षणावरून काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने उच्च न्यायालयाने एकाच दिवशी निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. राज्यातील 24 नगरपरिषद आणि नगर पंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.



