6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

BMC Election उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार

BMC Election: बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ अंतर्गत आज (दिनांक १५ जानेवारी २०२६) झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून विविध ठिकाणच्‍या २३ मतमोजणी कक्षात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेकरिता तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्यास महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. माननीय भारत निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. माननीय राज्य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), पोलिस खात्‍याकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आज मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) विश्‍वास शंकरवार, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्‍त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्‍लाळे, उपजिल्‍हाधिकारी महादेव किरवले यांच्‍यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी (R.O.) उपस्थित होते.

महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, माननीय भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे.

मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही गगराणी यांनी स्पष्ट केले.

मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्‍यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार, तसेच माध्‍यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींंना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी, नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या