Devendra Fadnavis on Prithviraj Chavan : देशातील राजकारणात भूकंप येणार असून लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देशाचे पंतप्रधान होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरू आहे. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संभाजीनगर दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिल्यांदा मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, मागच्यावर्षी आजच्या दिवशी मी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड आशीर्वाद दिला आणि आम्ही 232 जागा मिळाल्या असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर पुढे बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान मोदीचं आरोग्य उत्तम असून 40 वर्षाच्या व्यक्तिलाही लाजवेल असं त्याचं आरोग्य आहे. पृथ्वीराज बाबांना अशी स्वप्न पडत असतात पण एक लक्षात ठेवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय उत्तम काम करत आहेत. देशांमध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे आणि ज्या पद्धतीने ते देशाला पुढे नेत आहे असे कोणीही करू शकत नाही. त्यामुळे 2029 ला देखील मोदीजीच पंतप्रधान असतील हे आपण लक्षात ठेवले पाहिजे असं संभाजीनगर येथे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण?
राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना पुढील काही दिवसात मराठी माणूस देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार असं म्हटले होते.



