Maharashtra Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात देखील झाली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाला रामराम ठोकत बंडाची घोषणा केली असून अधिकृत उमेदवाराविरोधातच निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे.
इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून पक्षात गेल्या काही दिवसांपासून घोळ सुरू होता. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना तिकीट देण्यास गारटकर यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध दर्शवला होता. स्वतः गारटकर यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागणी केली होती आणि “अन्याय सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी नेतृत्वाला दिला होता.
मात्र, हा इशारा दुर्लक्षित करत पक्षाने शहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आणि त्यांनी अर्जही दाखल केला.
या घडामोडीनंतर गारटकर यांनी बंडाची बिगुल फुंकत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. पक्ष निष्ठेने काम करूनही वारंवार डावलले गेल्याचा आरोप त्यांनी केला. “नगराध्यक्ष पदाची उमेदवारीही नाकारली गेली, त्यामुळे आता गप्प बसणार नाही,” असे ते म्हणाले.
गारटकर यांनी नवीन ‘विकास आघाडी’ उभारून त्याच्याच माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी आज अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. तसेच इतर काही पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचाही त्यांनी दावा केला आहे.
दरम्यान, अजित पवार गटाने भरत शहा यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप, दोन्ही शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गारटकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे. जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या तिन्ही पक्षांत अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यामुळे पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या विरोधात एक नवीन आघाडी उभी राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
दरम्यान, पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेच बंडाच निशाण फडकावल्यानंतर इंदारपुरच्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याच लक्ष लागलं आहे. त्यामुळे गारटकर आणि अजित पवारांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. त्यामुळे यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



