Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्ह्यातील नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात राम खाडे यांना गंभीर जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगरमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र त्यांची
प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले आहे.
नगर – सोलापूर महामार्गावर मांदळी गावाजवळ खाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता. हॉटेलमध्ये जेवण करून नगरकडे निघाल्यानंतर रात्रीच्या वेळी 10 ते 15 जणांनी तोंडाला रुमाल बांधून लाठ्या, तलवार, पिस्तूल आणि सत्तूरने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते.
सर्व जखमींना तत्काळ नगरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले.
हल्ल्याच्या ठिकाणाहून पळताना एका हल्लेखोराच्या हातातून सत्तूर खाली पडल्याची माहिती असून घटना स्थळावरील व्हिडीओमध्ये सत्तूर असल्याचे दिसत आहे. दरम्यान हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला.
खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. त्यामुळे हल्लेखोरांसह हल्ला घडवून आणणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी खिळे यांनी केली आहे.



