Raj Thackeray: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची राज्यात रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांकडून जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवता यावा यासाठी जोरदार प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक राज ठाकरे (Raj Thackeray) देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. या निवडणुकीसाठी मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray Shivsena) गटाशी युती करणार आहे. सध्या दोन्ही पक्षांमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा देखील सुरू झाली आहे. ठाकरे गट मनसेला 70 पेक्षा जास्त जागा देणार असल्याने बोलले जात आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे यांना अहिल्यानगरमध्ये मोठा धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे. पक्षावर नाराज होत उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
कोपरगाव येथील रहिवाशी आणि मनसे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांच्यासोबत मनसे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी सुद्धा मनसेचा राजीनामा दिला आहे.
नेमकं कारण काय?
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी शेवटपर्यंत वाट पाहून देखील मनसैनिकांना पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म न मिळाल्याने मनसे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाचा राजीनामा दिला आहे.
मुंबई महापालिकेत मनसे 70 जागांवर लढणार?
तर दुसरीकडे सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होणार असून मनसेला ठाकरे गटाकडून 70 किंवा त्या पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तर या निवडणुकीसाठी मनसेने 135 उमेदवारांची यादी तयार केली असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून काही वाद निर्माण होणार का? अशी चर्चा राज्यातील राजकारणात जोराने सुरू आहे.



