Murlidhar Mohol : राज्यात महापालिका निवडणुकीमुळे जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष या निवडणुकीत अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात निवडणूक लढवत आहे. तर काही ठिकाणी युती म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. तर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
या बातमीनुसार, पुणे महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेत युती होणार आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व महापालिकांच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महायुती म्हणूनच लढतील, असा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतला आहे. त्यानुसार पुण्यात आम्ही युती म्हणून एकत्र लढू. गुरुवारी शिवसेनेशी प्राथमिक चर्चा झाली. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री व भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी झाली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ‘राज्यात महायुतीचे सरकार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकमताने राज्यातील महापालिका निवडणुका युती म्हणून लढवायचे ठरवले आहे. त्यानुसार पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली. ही प्राथमिक चर्चा होती. त्यात निश्चित काही प्रभाग, आकडे आणि जागांबाबततही चर्चा झाली. मात्र, यापुढेही आमच्या काही बैठका होतील, त्यात याला अंतिम स्वरूप दिले जाईल,’असे मोहोळ म्हणाले.
तर दुसरीकडे पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीसाठी चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 16 जानेवारी रोजी पुण्यात महापौर कोणाचा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.



