Rahat Municipal Council : राहाता नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान ‘ईव्हीएम (EVM) मशीन बदलल्याने गोंधळ’ अशा आशयाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे. यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत खुलासा केला असून, मशीन बदलण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच झाल्याचे स्पष्ट केले आहे.
कमिशनिंग प्रक्रिया
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कमिशनिंग प्रक्रिया 28 नोव्हेंबर 2025 रोजी सर्व उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनचे ‘सेटिंग व सिलिंग’ (EVM Commissioning) करण्यात आले होते. यावेळी स्वाक्षरी घेऊन प्रक्रिया पूर्ण झाली होती.
मशीन बदलण्याचे तांत्रिक कारण
1 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मतदान साहित्य वाटप सुरू असताना, काही केंद्राध्यक्षांना त्यांच्या साहित्यातील कंट्रोल व बॅलेट युनिट ‘नादुरुस्त’ असल्याचे आढळले. निवडणूक प्रक्रियेत बाधा येऊ नये म्हणून, नियमानुसार राखीव (Reserved) साठ्यातील मशीन्स बदलून देण्यात आल्या. या राखीव मशीन्स देखील 28 नोव्हेंबरलाच उमेदवारांसमक्ष तयार करण्यात आल्या होत्या.
उमेदवारांना लेखी सूचना
बदलण्यात आलेल्या ईव्हीएम युनिट्सची माहिती संबंधित उमेदवारांना 1 डिसेंबर 2025 रोजीच्या पत्राद्वारे लेखी स्वरूपात देण्यात आली आहे.



