Weightlifting Competition : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या शुभम चिमटे या विद्यार्थ्याने रौप्य पदक पटकावले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या वतीने फलटण येथील श्रीमंत शिवाजी राजे कृषी महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वेटलिफ्टिंग प्रकारात डॉ. आर. एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन कृषी महाविद्यालयातील शुभम चिमटे हा विद्यार्थी सहभागी झाला होता. त्याने 110 किलो वजन गटात उत्कृष्ट नियंत्रण, ताकद आणि तंत्र यांचा योग्य समन्वय साधत 113 किलो वजन उचलत स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. त्याला महाविद्यालयातील क्रीडा प्रशिक्षक प्रा. अशोक ढेरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
शुभम चिमटे याने केलेला प्रदीर्घ नियमित सराव, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ, सचिव राहुल गुंजाळ व वृंदावन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर यांनी अभिनंदन केले.



