Sindhudurg News : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील प्रगतशील शेतकरी उत्तम फोंडेकर यांनी लाल शेवग्याच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. या वाणाला एस.के.यू. अशी अधिकृत ओळख मिळाली आहे.
मोनोहायब्रिड व डायहायब्रिड पद्धतीने संशोधन करून विकसित केलेल्या या लाल शेवग्याच्या वाणाला केंद्र सरकारकडून पेटंट मंजूर करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली असून, पेटंट मिळाल्याचे प्रमाणपत्र उत्तम फोंडेकर यांना प्रदान करण्यात आले आहे. या शेवग्याच्या वाणाला पेटंट व त्याचे अधिकार मिळावेत यासाठी गेल्या काही काळापासून प्रयत्न सुरू होते. अखेर केंद्र सरकारकडून या वाणाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
या लाल शेवग्याच्या वाणात इतर शेवग्यांच्या तुलनेत प्रथिने, जीवनसत्त्वे आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. या शेवग्याच्या शेंगांची लांबी सुमारे दोन फूट असून, चवीला उत्कृष्ट असल्याची माहिती उत्तम फोंडेकर यांनी दिली.



