6 C
New York
Thursday, January 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Pratap Sarnaik : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढ, कार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी एक सर्वसमावेशक ‘पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करत, सुधारणा ‘वेग’ आणि ‘नियमितता’ या दोन चाकांवर एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
ते मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्या सह सर्व खाते प्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते.

दैनंदिन बैठकींनी प्रशासन सज्ज

एसटी स्वतःला ‘चल संस्था’ म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावे, यासाठी सकाळी १० वाजता आगारात, ११ ला विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे.
प्रवासी तक्रारी, रद्द फेऱ्या, नादुरुस्त वाहने, गैरहजर कर्मचारी, या सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा मंत्र या बैठकींना दिला आहे.

संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आगार, विभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे.

चालक–वाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे – कार्यक्षमतेवर भर

डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक. त्यामुळे KPTL (किलोमीटर प्रति १० लीटर)नुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले गेले आहे.

तिकीट विक्री ही महसुलाची जीवनवाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM(संचित प्रति किलोमीटर उत्पन्न) प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशन, कर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज — सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल.

वेळापत्रक व्यवस्थापनात सुधारणांचे वारे

एसटीचे वेळापत्रक हा त्याच्या वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे.

मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.

1 जानेवारीला बसस्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाईल. वक्तशीरपणा आणि नियमितता ही एसटीची नवी ओळख बनवण्याचा संकल्प यातून स्पष्ट दिसतो.

लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेसना नवे मानदंड

आरक्षणास उपलब्ध बसची संख्या वाढवणे, भारमान ८०% पेक्षा कमी न ठेवणे, चांगले भारमान असणाऱ्या दिवशी जादा फेऱ्यांची उपलब्धता, आणि प्रत्येक फेरीची देखरेख पर्यवेक्षकांच्या ‘दत्तक’ तत्त्वावर बस फेऱ्या देणे— अशा अनेक सुधारणा लांब-मध्यम पल्ल्याच्या व्यवस्थापनात होत आहेत.
यासोबतच ऑनलाइन व मोबाईल अ‍ॅपद्वारे आरक्षणाला मोठे प्रोत्साहन देण्याचा मानस आहे.

‘प्रवासी देवो भव’ – सुविधांचा दर्जा उंचावणार

स्वच्छ, टापटीप बसस्थानके, प्रसाधनगृहांची दररोज किमान तीन वेळा तपासणी, उशिरा सुटणाऱ्या किंवा रद्द बस फेऱ्यांची प्रवाशांना योग्य माहिती, पर्यायी व्यवस्था आणि अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक सार्वजनिक नजरेस आणणे, अशा प्रवासी सुविधांना केंद्रस्थानी ठेवणारी उपाययोजना राबवली जाणार आहे.

तक्रारींची तातडीने दखल, नोंद आणि निराकरण यावर आगार व्यवस्थापकांना विशेष भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

 

एसटीच्या आर्थिक पुनरुत्थानाच्या दिशेने ही पंचसूत्री केवळ मार्गदर्शक तत्त्वे नाहीत, तर संपूर्ण व्यवस्थेला बदलण्याचा एक ठोस आराखडा आहे. असे मत यावेळी बोलताना मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या