Yavatmal News : ‘कॉटनसिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा प्रादुर्भाव नवीन वर्षातही कायम असल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
इंग्रजी कॅलेंडरनुसार 2026 च्या जानेवारी महिन्यातील अवघ्या 31 दिवसांत जिल्ह्यात तब्बल 22 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले असून, कर्जाचा बोजा आणि योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश शेती कापूस आणि सोयाबीनवर अवलंबून आहे. गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सुमारे 6 लाख हेक्टरवरील पिकांना तडाखा बसला. सोयाबीनचे पीक मातीमोल झाले, तर अनेक शेतकऱ्यांना बियाण्यांचाही खर्च निघू शकला नाही. परिणामी कर्ज, मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले.
प्रशासनाने जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या 22 आत्महत्यांपैकी 10 शेतकऱ्यांनी विष प्राशन केले, तर 8 जणांनी गळफास घेतला. उर्वरित चार प्रकरणांमध्ये एका शेतकऱ्याने विहिरीत उडी घेतली, दोघांचे मृतदेह विहिरीत आढळले, तर एकाचा मृतदेह शेतात आढळून आला.
निसर्गाची अवकृपा, कर्जाचा डोंगर आणि शेतीमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. नवीन वर्षाची सुरुवातच अशा क्लेशदायक घटनांनी झाली असून, शेतकऱ्यांसाठी ठोस मदत आणि उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



