उंदीरगाव(अहिल्यानगर अपडेट24 वृत्तसेवा) :-श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील सर्कल क्रमांक ६ मधील गावठाणासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत रोहित्राचा शॉक लागून एका म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. १९) सकाळी घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, मृत पशुधनाच्या मालकाला तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.
गोरख पवार यांची म्हैस रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता गळ्यातील दोरखंड तोडून गवत खाण्यासाठी रोहित्राजवळ गेली. यावेळी रोहित्रालगतच्या आर्थिंगमध्ये विद्युत प्रवाह असल्याने तिला जोरदार शॉक बसला. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ विद्युत पुरवठा बंद करून पुढील अनर्थ टाळला. माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाद्रे, संदीप चव्हाण, आब्बासभाई शेख, थोरात आदींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी सागर ताके व बारहाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रविवारची सुटी असल्याने मृत जनावराचा पंचनामा सोमवारी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शेती महामंडळ बंद झाल्यानंतर परिसरातील अनेक कुटुंबे रोजंदारीवर उदरनिर्वाह करीत आहेत. गोरख पवार यांनीही कर्ज काढून पशुधनाचे संगोपन सुरू केले होते. मात्र, या दुर्घटनेमुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. संबंधित शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई मिळावी, तसेच गावातील विद्युत रोहित्रांच्या सुरक्षेची तपासणी करून अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



