अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत काही वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या बेजबाबदार प्रवृत्तींबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सत्य, निष्पक्षता आणि जनहित या पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांना बाजूला सारत काही डिजिटल माध्यमांद्वारे वैयक्तिक स्वार्थ, प्रसिद्धी आणि दबावतंत्राला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा वाढत आहे. यामुळे अनेक दशकांपासून विश्वासार्ह पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत आणि मान्यताप्राप्त माध्यमांची प्रतिमाही मलीन होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.पत्रकारितेचा उद्देश समाजातील प्रश्न मांडणे, भ्रष्टाचार उघड करणे आणि प्रशासनाला जबाबदार धरणे हा असतो. मात्र काही ठिकाणी पडताळणी न करता एकतर्फी बातम्या प्रसिद्ध करणे, संबंधितांची बाजू न घेता सलग नकारात्मक बातम्यांची मालिका चालविणे, सनसनाटी मथळ्यांद्वारे वातावरण तापविणे आणि वैयक्तिक हितसंबंध जोपासण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. अशा प्रवृत्तीमुळे पत्रकारिता आणि वैयक्तिक अजेंडा यातील सीमारेषाच धूसर होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.विशेष म्हणजे एखादे काम न मिळणे, व्यावसायिक मतभेद किंवा अन्य कारणांनंतर संबंधित कार्यालय, अधिकारी अथवा संस्थांविरोधात सातत्याने नकारात्मक बातम्या प्रसिद्ध करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. पत्रकारितेचा वापर जनहितासाठी नव्हे, तर वैयक्तिक स्वार्थासाठी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत असून, ही प्रवृत्ती वेळीच रोखली नाही तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील विश्वासाला मोठा धक्का बसू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.जिल्ह्यात अनेक वेबसाईट आणि युट्यूब चॅनेल कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याबाबत अशा प्रकारच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आलेल्या नाहीत. एका तथाकथित डिजिटल माध्यमाच्या कार्यपद्धतीबाबतच वारंवार आक्षेप आणि तक्रारी पुढे येत असल्याने त्याच्या कामकाजाविषयी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित माध्यमाची पत्रकारितेची कार्यपद्धती, निष्पक्षता तसेच विविध सार्वजनिक आणि निवडणुकांदरम्यान घेतलेल्या भूमिकांची वस्तुनिष्ठ पडताळणी होणे आवश्यक असल्याची चर्चा आता पत्रकार वर्तुळात सुरू झाली आहे.अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि अधिकृत माध्यमांचे प्रतिनिधीही पत्रकारितेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक हितसंबंध, दबावतंत्र किंवा एकतर्फी मोहिमा खपवून घेतल्या जाऊ नयेत, अशी भूमिका व्यक्त करत आहेत. सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी, यासाठी संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही पुढे येत आहे. दुसरीकडे, हा वाद वैयक्तिक स्वरूप धारण करत असल्याचे सांगत, “व्यक्तिगत संघर्षात आमचे कोणतेही काम नाही; आमची बांधिलकी केवळ निष्पक्ष पत्रकारितेशी आहे,” अशी भूमिका घेत अनेक पत्रकार या वादापासून अलिप्त राहत असल्याचेही बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर, डिजिटल माध्यमांच्या नावाखाली पत्रकारितेचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्या प्राधान्याने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी करावी. चौकशीत कायद्याचे उल्लंघन किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी अधिकृत माध्यमांच्या प्रतिनिधींकडून होत आहे. पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ती कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थाची किंवा ठेकेदारीची साधने बनू नयेत, यासाठी शासन आणि प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची वेळ आल्याचे मत व्यक्त होत आहे.पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेल्या बेजबाबदार आणि नियमबाह्य प्रवृत्तींकडे दुर्लक्ष करणे हे लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे शासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी अशा तक्रारी गांभीर्याने हाताळून सत्यता पडताळावी, दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी जोरदार मागणी आता विविध स्तरांतून होत आहे.



